रविवार, ९ डिसेंबर, २०१२

सावरकर इंग्रजांची क्षमा मागून अंदमानातून सुटले!

सावरकर इंग्रजांची क्षमा मागून अंदमानातून  सुटले! नुसती क्षमा मागून नाही तर "मी राजकारणात भाग घेणार नाही व माझी चौकशीही पुष्कळ चांगली झाली व शिक्षाही अधिक न्याय्य झाली हे खरे आहे" अशी सपशेल शरणागती पत्करून सुटले व ह्याचे पुरावे नवी दिल्लीच्या 'शासकीय अभिलेखागारात' उपलब्ध आहेत.  (पहा: Far from heroism - The tale of 'Veer Savarkar by Krishnan Dubey and Venkitesh Ramakrishnan, 7 Apr 1996, Frontline) 

ज्याव्यक्तीने सावरकर चरित्र अभ्यासले आहे किंवा निदान 'माझी जन्मठेप' हे आत्मचरित्र वाचले आहे त्यांना ह्या आरोपातील फोलपणा त्वरीत लक्षात येईल.  “काराग्रुहात राहून जी करता येत आहे त्याहून काही तरी अधिक प्रत्यक्ष सेवा या आमच्या मात्रुभूमीची करता येईल अशा प्रकारच्या कोणत्याही अटी मान्य करून मुक्तता करून घेणे हे प्रतियोगी धोरणानेच नव्हे तर समाजहिताचे द्रुष्टीनेही आमचे परम कर्तव्य आहे.” (माझी जन्मठेप: भाग २, लेखक: वि.दा. सावरकर, पृष्ठ क्रमांक: १६१, online आव्रुत्ती) व तसेच “अंदमानात जे काय राष्ट्रहित साधता येईल ते इतके महत्त्वाचे कधीही नसणार की जितके मुक्तता झाल्यास हिंदुस्थानात येऊन साधता येईल; परंतु म्हणून मुक्ततेसाठी वाटेल ते विश्वासघातक, निंद्य, नीच आणि देशाच्या किंवा जातीच्या स्वाभिमानास कलंक लागेल, असे लाळघोटी वर्तन त्यामुळे समर्थनीय ठरणार नाही. कारण त्यायोगे होणारी मुक्तता ही राष्ट्रास अधिक हितकारक होण्यापेक्षा स्वतःचे उदाहरणाने अधिक अनीतिमान आणि राष्ट्र्घातकी मात्र होणारी होती.” (कित्ता-२, पृष्ठ: १०९) अशी त्यांची मनोभूमिका होती. म्हणजे सुटकेसाठी वाट्टेल त्या देशविघातक-देशद्रोही अटी त्यांनी मान्य केल्या नाहीत.
सावरकर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सच्चे अनुयायी होते. अफजलखानवधा आधी, सिद्दी जोहारच्या वेढ्याच्यावेळी, आग्र्यातील बंदीवासाच्यावेळी त्यांनी अशीच शत्रूला बेसावध करणारी पत्रे पाठवली होती, तसेच पुरंदरच्या तहावेळी महाराजांनीही अशीच वेळप्रसंगी औरंगजेबापुढे शरणागती पत्करली, त्याच्या मानहानीकारक अटी मान्य केल्या व पुढे सामर्थ्य प्राप्त होताच प्रतिशोध घेतला. ही एक राजकीय कूटनीति होती. व्हिएतनामच्या कम्युनिस्ट 'हो-चि-मिन्ह'नेसुद्धा चीनच्या कोमिंग्टांग कारागृहातून अशाच प्रकारचे पत्र व सहकार्याची अट मान्य करून सुटका करून घेतली होती. मार्शल चांगला त्याने कोमिंग्टांग शासनाच्या आधाराने इंडोचायनात स्थापन झालेल्या 'डाँग-मिन्ह-होई' (जी 'हो-चि-मिन्ह'च्या 'व्हिएत-मिन्ह'ला शह देण्यासाठी स्थापिली होती) या संघटनेचे काम करण्याची इच्छा व्यक्त केली व सुटका करून घेतली. (व्हिएतनाम: अर्थ आणि अनर्थ, लेखक: वि. ग.कानिटकर,  मनोरमा प्रकाशन १९९८, पृष्ठ क्रमांक ५३)
पहिले महायुद्ध १९१४ ला सुरू झाल्यावर सावरकरांनी हिंदुस्थान सरकारकडे आवेदनपत्र धाडले, ते पत्र मुळातूनच वाचावे, मी त्याचा मुख्य आशय उधृत करतो:“हिंदुस्थानाला औपनिवेशक स्वायत्तता (Colonial-Self Government) द्यावी, वरिष्ठ विधिमंडळात हिंदी प्रतिनिधीचे निरपवाद बहुमत व त्याबदल्यात क्रांतिकारक इंग्लंडला महायुद्धात सहाय्य देतील अशा मागण्या केल्या होत्या व ‘युरोपात बहुतेक राष्ट्रे आपआपले अंतर्गत राजबंदी सोडून देत होती, आयरिश 'राजद्रोही' बंदीही सुटले होते’ अशी उदाहरणेही दिली होती. तसेच मला सोडता येत नसेल तर सरकारने मला न सोडता अंदमानतल्या, हिंदुस्थानातल्या आणि बाहेर देशोदेशी निर्वासित होऊन अटकून पडलेल्या राजबंदीवानांस तात्काळ मुक्त करावे. त्यांच्या मुक्ततेत मला जवळजवळ माझ्या मुक्ततेइतकाच आनंद वाटेल." अशी निस्वार्थी मागणीही केली होती. (कित्ता-२, पृष्ठ:४५-४६) म्हणजे सावरकरांची आवेदनपत्रे-मागण्या क्रांतिकारकांच्यावतीने होत्या वैयक्तिक स्वार्थाकरिता नव्हत्या.
सावरकरांना ह्याची जाणीव होती की काही झाल तरी ब्रिटीश आपल्यावर विश्वास ठेवणार नाहीत व राजकारणात भाग घेऊ देणार नाहीत, म्हणून मग ‘कारागारीय अन्वेक्षेक मंडळा’पुढे त्यांनी अशी भूमिका मांडली-- "राजकारण करू देत नसाल तर इतर दिशेने देशाची आणि मानवजातीची सेवा करीन, हित करण्यास झटेन. बरे मी ते वचन मोडले तर आपणास मला पुन्हा जन्मठेपीवर धाडता येईल.(कित्ता-२, पृष्ठ:१११). तसेच राज्यपालांशी झालेल्या सुटकेसंदर्भातील चर्चेतही त्यांनी ह्याचे सुतोवाच केले होते, त्याचा सारांश असा: "काही अवधीपर्यंत राजकारणात - प्रत्यक्ष चालू राजकारणात आपण भाग घेणार नाही. कारागारातही राजकारणात प्रत्यक्ष भाग घेता येतच नाही. परंतु बाहेर राजकारणव्यतिरिक्त शैक्षणिक, धार्मिक, वाड्मयात्मक अशा अनेक प्रकारांनी तरी राष्ट्राची सेवा करता येईल. लढाईत पकडलेले सेनापती, युद्ध चालू आहेतो प्रत्यक्ष रणात उतरू नये, 'धरीना मी शस्त्रा कदनसमयीं या निजकरी' अशी यदुकुलवीराप्रमाणेच प्रतिज्ञा करवून घेतल्यावर त्या अभिवचनावर (on Parole), सोडण्यात येतच असतात. आणि त्या यदुकुलवीराप्रमाणेच ते राजनीतिज्ञ सेनानी प्रत्यक्ष शस्त्रसंन्यास तेवढा करावा लागला तरी राष्ट्रकार्यात त्याचे सारथ्य तरी करता यावे म्हणून अशी अट मान्य करण्यात काही एक कमीपणा मानीत नाहीत तर उलट तसे करणे हेच तत्कालीन कर्तव्य समजतात." (कित्ता-२, पृष्ठ:१६२) ह्यानुसार सावरकरांनी कारावासातील मुक्ततेनंतर अटीनुसार राजकारणाव्यतिरिक्त शुद्धी, समाजसुधारणा, विज्ञाननिष्ठता, भाषाशुद्धी, लिपीसुधारणा अशा प्रकारे प्रचंड समाजकारण केले.
जे जे राजबंदीवान अंदमानातून सुटले त्यातील बहुतंशी जणांनी अशाच प्रकारच्या करारपत्रावर स्वाक्षऱ्या करून सुटका करून घेतली होती. उदा. "मी यावर पुन्हा कधीही - किंवा अमुक वर्षे - राजकारणात आणि राज्यक्रांतीत भाग घेणार नाही. पुन्हा मजवर राजद्रोहाचा आरोप सिद्ध झाला तर मी ही माझी मागची उरलेली जन्मठेपही भरीन! (कित्ता-२,पृष्ठ:१२०)
सावरकरांचे जे पत्र 'क्षमापत्र' म्हणून दाखवतात ते पाहण्यासाठी नवी दिल्लीच्या 'शासकीय अभिलेखागारात' जायची आवश्यकता नाही. ते पत्र 'अंदमानच्या अंधेरीतून' ह्या पुस्तकात ‘पत्र ८ वे- दिनांक ६-७-१९२०’ शीर्षकाखाली छापलेले आहे.(इंग्रजांना पाठविलेल्या आवेदनाचा मूळ दिनांक २-४-१९२०).हा पहा त्यातील मुख्य गाभा:
हिंदुस्थानातील वरिष्ठ कार्यकारी मंत्रिमंडळाच्या सभासदासारख्या प्रतिष्ठित अधिकाऱ्यांनी मला आणि इतरांना पुढील प्रश्न पुष्कळदा टाकला होता - "तुम्ही पूर्वीच्या हिंदी राज्याच्या विरूद्ध उठावणी केली असती तर तुमची स्थिती काय असती? ते विद्रोह्यांना हत्तीच्या पायाखाली तुडवीत!" त्याला माझ्याकडून उत्तरही मिळाले होते. हिंदुस्थानातच काय, जगाच्या कोणत्याही देशात - प्रत्यक्ष इंग्लंडमध्ये सुद्धा - विद्रोह्यांना कधी कधी असली भयंकर शिक्षा भोगण्याचे दैवी येई. पण मग इंग्रज लोकांनी युद्धाच्या वेळी जर्मन लोक आमच्या बंद्यांना वाईट रीतीने  वागवतात आणि त्यांना रोटी आणि लोणी देत नाहीत अशा कोल्हेकुईने जगाच्या कानठळया का बसवाव्या?  एक काळ असा होता की ज्या वेळी काराग्रुहातील बंद्यांची जिवंतपणी कातडी सोलीत आणि त्यांना मोलॉक, ठॉर किंवा असल्याच युरोपातील युद्ध देवतांना बळी देत असत" अशी आठवण दिली. खरी गोष्ट अशी आहे की, ही जी जगाच्या संस्कृतीत मनुष्यप्राण्याने सुधारणा घडवली आहे ती सर्व राष्ट्रांतील मनुष्याचे प्रयत्नांचे संकलित फळ आहे आणि म्हणून तिच्यावर सर्व मनुष्यजातीचा वारसा आहे व तिचा लाभ सर्वांना मिळाला पाहिजे. त्या रानटी युगाच्या तुलनेनेच म्हणावयाचे तर माझी चौकशीही पुष्कळ चांगली झाली व शिक्षाही अधिक न्याय्य झाली हे खरे आहे; आणि मनुष्यभक्षक जाती आपल्या बंद्यांना जी शिक्षा देत किंवा चौकशीचे जे नाटक करीत त्यापेक्षा अधिक चांगली पद्धती या सरकारची आहे या प्रशस्तीपत्राने सरकारचे समाधान होत असेल तर त्याला माझी ना नाही. पण त्यावेळीच हेही विसरता कामा नये की, पूर्वीच्या काळात राजे विद्रोह्यांना जसे जिवंत सोलीत त्याचप्रमाणे विद्रोहीही त्यांची भाग्यतारा जोरात आल्यावर या राज्यकर्त्यांना जिवंत जाळीत! आणि इंग्रजी जनतेने मला किंवा इतर विद्रोह्यांना अधिक न्यायाने म्हणजे थोड्या रानटीपणाने वागवले असेल तर त्यांनाही आश्वस्त असावे की परिस्थितीची उलटापालट होऊन हिंदी क्रांतिकारकांची तशी पाळी आली तर त्यांच्याकडून त्यांनाही असेच अत्यंत दयेच्या रीतीने वागविण्यात येईल!
  
तसेच असाही आरोप केला जातो की,  सर्वांनी अमान्य केलेला माँटेग्यू-चेम्सफर्ड सुधारणा निर्बंध सावरकरांनी स्वीकारला. सावरकरांनी काही सुचना केल्या होत्या व त्या मान्य झाल्या तरच तो मान्य असेल असे सांगितले होते. पुरावा म्हणून सावरकरांनी माँटेग्यू आणि गव्हर्नर जनरलला लिहिलेले आवेदनपत्र वाचा: “सरकार खरोखरीच दायित्वपूर्ण शासनाधिकार म्हणजे कमीत कमी वरिष्ठ विधिमंडळात परिणामकारक बहुमत ज्यावर अर्थातच तो एखादा राज्य-समिती (Council od State) चा दगडोबा प्रत्येक वरात शाप मिसळविण्यासाठी स्थापिलेला नाही, असे लोकपक्षीय प्रतिनिधींचे बहुमत देणार असेल आणि या अधिकारदानासहच अशेष राजबंदीवानांस, युरोप आणि अमेरिका इत्यादी ठिकाणी अडकून पडलेल्या आमच्या निर्वासितांसह सर्व राजदंडितांस मुक्त करण्याचे औदार्य दाखवीत असेल तर निदान मी तरी - आणि मजप्रमाणेच इतर कित्येक - अशी राज्यघटना प्रामाणिकपणे स्वीकारीन आणि जर आमच्या लोकांना आपले प्रतिनिधी म्हणून आम्हास निवडणे योग्य वाटले तर त्याच विधिमंडळाच्या सभांगणात आमच्या आयुष्याच्या परमध्येयासाठी आम्ही झटू की ज्या विधिमंडळांनी आजपर्यंत आमच्याविषयी केवळ द्वेषच काय तो धारण केला आणि त्यांच्या कार्याविषयी आणि धोरणाविषयी आमच्या मनात तिरस्कार उत्पन्न करून ठेवला.”(कित्ता-२, पृष्ठ:८२) ब्रिटिशांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला हे सांगावयाला नकोच!
सावरकर शत्रूला फसवायचा प्रयत्न करत होते पण ब्रिटीश न फसता स्वकीयच फसले. कधीही कुठलाही ठराव, आवेदन अशा प्रकारची राजकीय पत्रे वाचताना 'दोन ओळींमधील' (between the lines) वाचता आले पाहिजे, जे सावरकरांच्या पत्रावर आक्षेप घेतात ते एकतर  'दोन ओळींमधील' वाचण्यास सक्षम नसतात किंवा 'दोन ओळींमधील' वाचण्याची त्यांची तयारीच नसते. सावरकरांच्या ह्या अटी, ही आवेदनपत्रे, ह्यामागील राजकीय खेळी, मनोभूमिका स्वत: सावरकरांनी कधीही लपवून ठेवली नाहीत. सावरकरांचे आत्मचरित्र 'माझी जन्मठेप' मध्ये ह्या सर्वाचा सांगोपांग उहापोह केलेला आहे. त्यामुळे आम्ही नवी दिल्लीच्या 'शासकीय अभिलेखागारात' जाऊन संशोधन करून पत्र शोधून काढली किंवा र.चं. मुजुमदार (R.C. Majumdar) ह्यांनी शोध लावला अशा फुशारक्या कोणी मारू नयेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा