ते म्हणाले, हिन्दुस्थानास मातृभू नि पितृभू मानणारे सर्वच जण हिन्दू आहेत(१),
नि आम्ही त्यांना इतर धर्मीयांचा तिरस्कार करणारा आंधळा धार्मिक समजलो.
ते म्हणाले, हिन्दूसस्थानात जातीच काय, पण धर्मांचेही संमिश्रण झाले आहे, त्यामुळे मीणसामाणसामधे भेद पाळणे चुकीचेच आहे(२).
राम मंदीर (पतितपावन मंदिर, रत्नागिरी)उभारुन तथाकथित अस्पृश्याला त्यांनी समाजविरोधात मंदीराचा भट बनवले. नि आम्ही त्यांना ब्राह्मणांचा नेता बनवले!
ते म्हणाले, भारतीय तरूणां-"तरुणीं"नो, NCC मधे जा, सैनिकी प्रशिक्षण घ्या, संशोधन क्षेत्रात आघाडी मारा (३),
आम्ही त्यांना, जुन्या विचारांचा नेता म्हणून अडगळीत टाकले!
ते म्हणाले, भारतीय भाषा परकीय हेतुपुरस्सर केल्या जाणार्या सांस्कृतिक आक्रमणापासून जपून ठेवा. मला मराठी येते, मराठीचे काम मी करतो. हिन्दीला पर्शियन नि अरबीपासून जपून ठेवा.(४)
आम्ही त्यांची कडवा मराठी नेता म्हणून वसलात लावली!
ते म्हणाले, गायीला उपयुक्त पशू माना. देश-धर्म संरक्षणासाठी वेळ पडली तर पळी-पंचपत्री वितळवून हत्यारे बनवा.(५)
आम्ही त्यांच्याच नावाने गोशाळांचा प्रचार करतो!
आक्रंदून ते म्हणाले, हे मातृभूमी...
तुजसाठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण..
आम्ही त्यांना स्वतंत्र भारतात, जमेल तितक्यावेळा "देशविघातक" कृत्यांच्या "संशयापायी" तुरूंगात ठेवले!
गोळीची पर्वा न करता त्यांनी जहाजातून उडी मारली नि आंतरराष्ट्रीत न्यायालयात भारताची स्थिती नेउन ठेवली,
नि आम्ही या कृत्याला "छलांगभर पोहणे" म्हणून हिणवले!
तात्याराव, कित्येक दशकांपुर्वी जगलात, आजही तुम्ही आमच्या पचनी पडत नाही! तात्याराव, नियतीला शह देत आयुष्य जगलात तुम्ही, पण नियतीने खुपच मोठी खेळी केली. आमच्या सारख्या भोंदू नि स्वार्थी नि मंद माणसांमधे तुम्हाला पाठवलं! आंधळ्यांनी हत्तीला चपापायचं तसं तुमचं आयुष्य आम्ही चपापतो नि मला सावरकर कळले म्हणून ओरडत सुटतो. अप्पलपोटी राजकारणापायी नि आंधळ्या धर्माभिमानापायी कधी विरोधक म्हणून तर कधी अनुयायी म्हणून आम्हीच तुम्हाला तोंडघशी पाडतो. तात्याराव सरस्वतीनं तुमचा आदर केला- प्रचंड विद्वत्ता दिली, ब्रह्मदेव नि सटवाई तुमच्या साहसाला नमून तुमची आयुष्यरेखा झक मारत वाढचत राहीले, गणेशानं हाती घेतलेल्या कामात यश दिलं... पण आम्ही मर्त्य भूमीवरील माकडाची उत्क्रांत रुपे, तुमच्या सारख्या रत्नाची किंमत आधी हुंगून, मग निरखून पाहून नि मग दगडावर आपटून पाहत करत बसलो!!
सावरकरांची बुद्धीनिष्ठा, विद्वत्ता, प्रगाढ अभ्यास, निस्वार्थीपणा, त्याग, शौर्य, धीर, द्रष्टेपणा हे सारं सारं समजते तर नवनिर्माण दूर नाही. आणि आमचे हे सर्व तुम्हाला हरवण्याचे चाळे पाहूनही जेव्हा तुम्ही म्हणता,
अनादी मी अनंत मी अवध्य मी भला ।
मारिल रिपु जगति असा कवण जन्माला ।।
तेव्हा वाटते तुम्ही समजो वा न समजो, पण इतके नक्की की भारतमातेला सार्थ अभिमान वाटावे असा तिचा एक सुपुत्र तुम्ही आहातच!!
संदर्भ:
१. हिन्दुत्व
२. हिन्दुत्व
३. मृत्युंजय दिनानिमीत्तचे पुण्यातील भाषण
४. भाषासुधारणेवरील निबंध
५. विज्ञानिष्ठनिबंध
-रोहित होळकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा