१) संभाजी ब्रिगेडचा आणि छत्रपति शिवाजी महाराज्यांच्या इतिहासाचा काडीमात्रही संबंध येत नाही. मुळात ‘संभाजी’ हा पर्शियन अपभ्रंशित उच्चार आहे. मूळ शब्द ‘शंभू अथवा शंभाजी’ असाच आहे. शिवरायांचे कुळदैवत शंभू महादेव त्याच नामावरून त्यांनी आपल्या जेष्ठ सुपुत्राचे नाव ठेवले होते. शंभाजी राजांच्या नाण्यांवर (श्री. राजा शंभु), मुद्रेवर ‘श्री शंभू शिवराजस्य...’, तसेच पत्रांवरही ‘शंभू’ असाच स्पष्ट उल्लेख आढळतो. पर्शियन लिपीत ‘श’ हे अक्षर नसल्याने त्याचा उल्लेख यवनांकडून ‘सिवा’ (शिवाजी नव्हे), ‘संभा’ (शंभाजी नव्हे) असाच त्रुटीत/अपभ्रंशित केला जाई. जे सर्वाथैव चुकीचे आहे. दुसरा शब्द ब्रिगेड, हा ही एक फिरंगी शब्द आहे. त्यामुळे ज्या दिंदवी स्वराज्या संस्थापक छत्रपति शिवाजी महाराजांनी आपल्या ‘न भूतो न भविष्यति’ अशा भव्य-दिव्य ‘जेष्ठ शुद्ध त्रयोदशी’ला केलेल्या राजाभिषेकानंतर व्यवहारातील पर्शियन, उर्दू भाषेचे वर्चस्व झुगारून आपली नाणी देवनागरी लिपीत पाडली, प्रचलित पर्शियन, अरेबिक शब्दांना संस्कृतप्रचुर प्रतिशब्द शोधून ‘राजव्यवहार कोष’ सिद्धं करवला त्या धर्माभिमानी (म्हणजे इतर धर्माचा दुस्वास नव्हे) राजाचा आणि या यावनी-फिरंगी नामयुक्त संस्थेचा दूरान्वयानेही संबंध नाही हे ध्यानात घेणे सर्व प्रथम आवश्यक आहे.
२) यांनी आजवर शिवरायांच्या आचारांच्या, विचारांच्या, नीतीच्या विरोधात उपक्रम करून, समाजस्वास्थ्य बिघडवून, जातीनिहाय राजकारणाची कास धरून निव्वळ ब्राम्हणद्वेष म्हणजेच शिवरायांचा ‘खरा इतिहास’ असे वारंवार सांगण्यातच अभिमान बाळगला, नव्हे तर तसेच आचरणही केले. शिवरायांच्या उच्च मूल्यांचा बळी तर ही मंडळी पदोपदी देत आहेत. कधी दादोजी कोंडदेव, कधी मोरोपंत पंतप्रधान, अण्णाजी दत्तो सुरनीस, कधी अफजलखानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी अशांचीच नावे घेत आपले जातीनिहाय राजकारण साधायचे. मात्र ज्या भोसले घराण्याने दादोजींना, मोरोपंतांना, सोनोपंत डबीरांना अत्यंत मानाने वागवले त्याच व्यक्तींवर चिखलफेक करून ही मंडळी ब्राम्हणांचा नव्हे तर खुद्द महाराष्ट्राला प्रथम पूजनीय अशा ‘भोसले’ घराण्याचाच उपमर्द करत आहेत असे म्हटले तर ते चूक ठरू नये. श्री क्षेत्र महाबळेश्वरी मातृभक्त शिवरायांनी जिजाऊसाहेबांची ‘सुवर्णतुला’ केली त्याचवेळी त्या श्रीमंत योग्याने शहाजीराजांपासून निष्ठेने स्वराज्याची सेवा करणाऱ्या सोनोपंत डबीरांचीही सुवर्णतुला केली. दादोजी कोंडदेवांच्या मृत्यूनंतर अनेक उपलब्ध पत्रांत त्यांचा आदरार्थी उल्लेख करणारे आचारशील, विचारशील शिवराय ‘आपण पोरके झालो’ असाही उल्लेख करत आहेत. शिवराय स्वराज्याच्या निष्ठावान सेवकाला या शब्दांनी धन्य करीत असतांना या संघटना त्यांचे पुतळे हटवून खुद्द छत्रपति शिवरायांच्याच अमर आत्म्याला अत्यंत क्लेष देत आहेत यात कोणतीही शंका नाही.
३) कोण्या एका निलाजऱ्या आंग्ल लेखकाच्या टुकार पुस्तकाबद्दल वादळ उठवून अख्ख्या महाराष्ट्राला त्या हीन शब्दांचा/वाक्याचा परिचय करून देऊन ब्राम्हण जातीतील लेखकांबद्दल विनाकारण गरळ ओकणारी ही सारी मंडळी काही वर्षांपूर्वी मालेगावमध्ये गणपतीची मूर्ती निहाल अहमदने लाथाडली तेव्हा ‘ब्र’ सुद्धा काढू शकली नाहीत. ज्या भांडारकर इंस्टिट्यूटवर बेगुमानपणे हल्ला चढवून त्या वास्तूतील ग्रंथसंपदा याच पराक्रमी वीरांनी(?)पायदळी तुडवली, फाडली, जाळली, नासधूस केली त्यांना सोप्या शब्दांत सांगावेसे वाटते की त्या साऱ्याच पुस्तकांत पानापानांवर, वाक्या-वाक्यांमध्ये शहाजी महाराज, जिजाऊ साहेब, शिवराय, शंभाजी महाराज, राजाराम महाराज आदि महाराष्ट्रालाच नव्हे तर प्रत्येक मराठी माणसाला वंदनीय अशा व्यक्तींचीच नावे, उल्लेख, छायाचित्रे होती. विकाराने विचारांवर मात केली की असे घडते. याचेच गोंडस नाव म्हणजे ‘असंतोष’. ज्या बाबासाहेब पुरंदऱ्यांच्या विरोधात यांचे सूर काळी सातला पोहोचतात ते नव्वदीतील शिवशाहीर म्हणतात की मी अजूनही शिवचरित्राचा एक छोटासा विद्यार्थीच आहे. त्यांना एकेरी नावाने उल्लेखून आपण उच्च पदाला जाऊ शकत नाही. तसेच आमचे स्पष्ट मत असे आहे की आपल्या कथनानुसार जर बाबासाहेब हे कोळसा आहेत तर इतकी वर्षे महाराष्ट्रातच, देशातच नव्हे तर परदेशातही शिवचरित्राचा सुगंध पसरवणारे, क्षणेक्षणी झिजणारे चंदन कोठे सापडेल ते दाखवावे अन्यथा व्यक्तीद्वेषातून, जातीद्वेषातून त्यांना लाखोली वाहणे थांबवावे.
४) मालवण नजीकच्या कुरटेबेटावर जेव्हा शिवरायांनी सिंधुदुर्गाचा पहिला चिरा पूजला तेव्हा त्यांनी स्थानिक उपाध्ये जानभट व दादंभट अभ्यंकर यांना पौरोहित्य करण्यास पाचारले, तेव्हा प्राणभयाने दोघेही सुरूवातीस येईनात तेव्हा त्यांना राजी करून, दिलासा देऊन मग त्या दुर्गाचे कायमस्वरूपी उपाध्येपण दिले. शिवनिधनोत्तर कालखंडात जेव्हा सिंधुदुर्ग पाडाव झाला तेव्हाही या घराण्याने “अखेरपर्यंत सेवा करीन” ह्या शिवरायांना दिलेल्या शब्दांशी ईमान राखून गड सोडण्यास नकार दिला. अफजल वधावेळी कृष्णाजी भास्कर या ब्राम्हणाने महाराजांवर तलवार धरली म्हणून वारंवार उल्लेख केला जातो पण त्याच अफजलच्या अंगरक्षकांत शंकराजी व पिलाजी मोहिते हे शिवरायांचे नातलग, तसेच त्यांचे चुलत चुलते मंबाजीराजे भोसले, जे त्याच लढाईत मारले गेले, त्यांच्याबद्दल अवाक्षरही निघत नाही. ज्या शंभाजी महाराजांच्या नावाने या भ्रष्ट संघटना सुरू आहेत त्या धर्मवीर छत्रपतिंना पकडून देण्यात त्यांचेच मेव्हणे व खुद्द शिवरायांचे जामात अशा दुहेरी नातेसंबंधात असूनही सदैव स्वराज्याच्या उदात्त हेतूऐवजी स्वतःच्या वतनाचाच आत्मकेंद्रित विचार करणारे गणोजी शिर्के हे प्रशंसेला पात्र ठरतात का? शंभाजी महाराजांसोबत वीरमरण पत्करणारे कवी कलश हे मात्र यांच्या दुर्दैवाने ब्राम्हण होते. थोडे मागे जाऊन पाहता, खुद्द शिवरायांच्या वडिलांवर म्हणजेच शाहाजी राजांवर तलवारीचा घाव घालणारे हे त्यांचेच ‘श्वशुर’ लखुजीराव जाधवराव होते हे इतिहासासही मान्य आहे. खुद्द सावत्रबंधू एकोजीरोजे हे ही अनेकदा शिवरायांविरूद्ध युद्धास ठाकले होते.
५) मुळात शिवचरित्र हा जातीयतेचा चष्मा लावून वाचण्याचा, अभ्यासण्याचा अथवा विवेचन करण्याचा विषय नाही. जे आजवर या देशात कधी घडले नव्हते ते छत्रपति शिवरायांनी अठरा पगड जाती-धर्मांच्या लोकांना एकत्र करून, स्वराज्याच्या महान सूत्रात बांधून हे पार्थ-पराक्रमी कार्य घडवून आणले. यात जसे पिढीजात वतनदार, पाटील, देशमुख, कुलकर्णी होते तसेच सर्वसामान्य घराण्यातील पण आपल्या असामान्य कामगिरीने शिवचरित्रात मानाचे पान लिहिणारेही अनेक झाले. त्यांच्याकडे हा अमका, तो तमका अशा विशिष्ट मनोवृत्तीने न पाहता हिंदवी स्वराज्यस्थापनेकरिता त्यांनी केलेले अजोड, प्रामाणिक प्रयत्न लक्षात घेणे हेच खऱ्या इतिहासअभ्यासकाचे लक्षण आहे. एकाच जातीला टार्गेट करून विनाकारण समाजमन कलुषित करून स्वार्थ साधण्याचे उद्योग आता सोडले पाहिजेत. वर्षानुवर्षे महाराष्ट्रातच नव्हे तर देशात अव्याहतपणे राजरोस विकली जाणारी छत्रपती शंभाजी महाराजांच्या नावाची संभाजी बिडी सुद्धा हे बंद करू शकत नाहीत त्यांनी व्यर्थ ‘खरा इतिहास’ या नावाखाली लोकांना भडकवू नये इतकीच अपेक्षा.
महाराष्ट्रातील शिवभक्तांची दिशाभूल करण्याचा जोरदार प्रयत्न कोल्हापूरवासीय विशिष्टं संघटनांकडून होत आहे. राजाभीषेकदिन तारखेप्रमाणे साजरा करण्याचा प्रयत्नं तसेच त्यानिमित्ताने समाजमन भडकवून शिवभक्तीचे नारे दिले जात आहेत. सरकारला हा विषय नीट न समजल्यामुळे सरकार त्याला पाठिंबा देत आहे.
- शिवराजाभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड
rajabhishek.samiti@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा